राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून याकाळात आचारसंहिता असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यातच कर्जत तालुक्यातील सांगवी या ठिकाणी बनावट सिगारेट कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत पर्दाफाश केला आहे. येथून तब्बल ५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने २४ ऑक्टोम्बरला एका फार्म हाऊसवर धाड टाकली. या ठिकाणी गोल्ड फ्लेक या नामांकित ब्रँडचे बनावट सिगारेट बनवण्याचा कारखाना सुरू होता. मागील ६ महिन्यांपासून हा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी येथे टाकलेल्या कारवाईत २ कोटी ३१ लाख रुपयांचे सिगारेट, तसेच सिगारेट बनवण्यासाठी लागणारे तंबाखू व इतर साहित्य तसेच मशिनरी मिळून ५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बनावट सिगारेट बनविण्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच येथील १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. या कारखान्याचा मालक दाक्षिणात्य असून त्याचा शोध सुरू आहे.