जळगाव । जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव येथे साडेतीन वर्षीय दृष्टिहीन चिमुकल्याच्या मृत्यूच्या प्रकरणाला पोलिस तपासात धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात समजल्या गेलेल्या या घटनेत, ७० टक्के दृष्टिदोष असलेल्या महिलेने पती आणि सासूवर विहिरीत ढकलून मुलाचा जीव घेतल्याचा तसेच स्वतःचाही खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या तक्रारीनंतर यावल पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
१३ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सरस्वती स्वप्नील पाटील (वय २७) आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा अंध मुलगा कृष्णा हे विहिरीत पडल्याची माहिती समोर आली होती. या घटनेत बालकाचा बुडून मृत्यू झाला होता, तर सरस्वती या गंभीर जखमी झाल्या होत्या. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
जखमी सरस्वती यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. प्रकृती चिंताजनक असल्याने सुरुवातीला त्या काहीही बोलू शकल्या नाहीत. मात्र, मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने त्यांची सखोल चौकशी केली. त्यावेळी सरस्वती यांनी दिलेल्या जबानीने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली.
विहिरीच्या पूजेचा बहाणा आणि घातपात
फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी सासू आशाबाई भागवत पाटील यांनी विहिरीची पूजा करण्याच्या बहाण्याने सरस्वती आणि त्यांच्या मुलाला शेतातील विहिरीजवळ नेले. तेथे अचानक सासूने त्या दोघांनाही विहिरीत ढकलून दिले. या संपूर्ण क्रूर कटात पती स्वप्नील याचाही पूर्ण सहभाग होता. विहिरीत पडल्यानंतर सुदैवाने तेथील लाकडी लाकडाचा आधार मिळाल्याने सरस्वती यांचा जीव वाचला, मात्र त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांचा निष्पाप चिमुरडा पाण्यात बुडाला.
तपासादरम्यान या गुन्ह्यामागील कारणही समोर आले आहे. फिर्यादी ७० टक्के दृष्टिदोष असलेली असून तिचा पती पूर्णपणे दृष्टिहीन आहे. जन्माला आलेले अपत्यही दृष्टिहीन असल्याने त्यावरून पती-पत्नीमध्ये दीर्घकाळ वाद सुरू असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. गर्भावस्थेदरम्यान गर्भपात करण्याबाबत मतभेद झाल्याने कौटुंबिक वाद अधिक तीव्र झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९(१) आणि ३(५) अन्वये पती आणि सासूविरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.














Discussion about this post