जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा सन २०२३ चा राज्यपातळीवरील प्रतिष्ठेचा असा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पंचक येथील प्रगतशील शेतकरी हेमचंद्र पाटील यांना जाहीर झाला आहे. यावर्षीचा हा पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी देण्यात येत असून दि. ११ ऑगस्ट रोजी विद्यापीठ नामविस्तार दिनी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून विद्यापीठाने राज्यपातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार सुरू केला आहे. गतवर्षी सामाजिक क्षेत्रासाठी हा पुरस्कार “भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान” मु. पो. झाराप, तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदूर्ग या संस्थेला दिला. यावर्षीचा हा पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी जाहीर झाला होता. त्यासाठी विद्यापीठाने प्रस्ताव मागविले होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या पुरस्कार निवडीसाठी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यामध्ये भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष व कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा मुंबई विद्यापीठाच्या जैवशास्त्र विभागाचे प्रोफेसर संजय देशमुख यांचा या समितीमध्ये समावेश होता. समितीने जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पंचक या गावातील प्रगतशील शेतकरी हेमचंद्र दगाजी पाटील यांची निवडीची शिफारस केली असून कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी ही शिफारस मान्य केली आहे.
हेमचंद्र पाटील यांनी बीएस्सी, एलएलबी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केलेले असून पंचक येथे ४० एकर बागायती शेतात नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यासोबतच दुग्ध उत्पादनाचा पुरक व्यवसायही आहे. कांद्याची गादी वाफ्यावर लागवड करून मायक्रो स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी व्यवस्थापन करून ६० टक्के पाण्याची बचत करीत विक्रमी उत्पादन घेतले. उती संवर्धित केळी लागवड करून ३० महिन्यात केळीची तीन पिके घेवून हेक्टरी १०० टनापर्यंत उत्पादन घेतले. डाळींब, हळद, अद्रक, काकडी, कलींगड यासारख्या विविध पिकांचे विक्रमी उत्पादन हेमचंद्र पाटील यांनी घेतले आहे. त्यांनी शेडनेट हाऊस उभारले आहे. शेती व्यवसाय करतांना कृषी प्रदर्शन, कृषी मेळावे या ठिकाणी व परिसरातील शेतक-यांना वेळोवळी ते मार्गदर्शन करतात.
इंटरनेट आणि सोशल मिडीयावरून शेतीमालाचा बाजार भावाविषयी माहिती गोळा करून ते शेतक-यांना देत असतात. “पाणी आडवा, पाणी जिरवा” या उपक्रमासाठी परिसरातील शेतक-यांना जागृत करून बांधबंदिस्ती, विहीर पुन:र्भरण यासारखे उपक्रम राबवले आहेत. “जागतिक अन्न सुरक्षेत भारतीय शेतक-यांचे योगदान” या विषयी अमेरिकेतील हावर्ड युनिर्व्हसिटीत जागतिक परिषदेत सहभागी होवून भारतीय शेतक-यांचे प्रतिनिधीत्व करीत त्यांनी सादरीकरण केले. आधुनिक शेती करतांना एकात्मिक सेंद्रीय व रासायनिक पध्दतीचा अवलंब करून एकात्मिक कीड व रोगांचे नियंत्रण करून सेंद्रीय पध्दतीने जमीनीची सुपीकता टिकवत उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांच्या या शेतीतील प्रयोगाचा नव्या पिढीला निश्चितच फायदा होईल असा विश्वास समितीने व्यक्त करून हेमचंद्र पाटील यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप एकावन्न हजार रूपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असून शुक्रवार दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. आर. एस. माळी यांचे हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. याच समारंभात विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक यांना देखील पुरस्कार दिले जाणार आहेत. अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.
Discussion about this post