पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला जाताना पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून यात दुर्घटनेत ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सर्व पोलीस कर्मचारी ड्यूटीसाठी निघाले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी सर्व पोलिसांची ड्यूटी लागली होती. नागौर जिल्ह्यातील खिंवसर ठाण्याचे पोलिस कर्मचारी गाडीमधून एकत्र निघाले होते. नागौरनंतर चुरु जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. पोलिसांचे वाहन आणि ट्रकची धडक झाल्याने हा मोठा अपघात घडला.
चुरूतल्या तारानगर येथे रविवारी पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे. सकाळी १० वाजता या सभेला सुरूवात होणार होती. मात्र तेथे पोहचण्यापूर्वीच काळाने पोलिसांवर घाला घातला. अपघात झाल्याने रस्त्यावर वाहनांची लाबंच लांब रांग लागली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच वाहतूक सुरळीत केली.