जळगाव : एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. समोरून ट्रक आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून पडल्याने हा अपघात झाला.या अपघातात अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
जळगावातील मूळ रहिवाशी व एरंडोल येथे स्थायिक राजेश विनोद बनसोडे (वय २२) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजेश हा सध्या एरंडोल येथे मामाकडे राहत होता व बँड पथकात कामाला होता. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, १४ एप्रिलला राजेश हा त्याच्या मित्रासोबत संध्याकाळी जळगावला येण्यासाठी निघाला. पिंपळकोठा गावाजवळ संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास समोरून अचानक ट्रक आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. त्यात दुचाकी घसरून राजेश व त्याचा मित्र गंभीर जखमी झाले.
या अपघातानंतर नागरिकांनी दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र राजेश याचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. तर त्याच्या मित्रावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राजेश यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post