धुळे । लाचखोरीच्या एक मोठी बातमी धुळ्यातून समोर आलीय. ४० लाखांच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी दोन लाखांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विभागाचे प्रभारी वेतन अधीक्षकाला बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.या कारवाईने खळबळ उडाली आहे.
महेंद्र गोपाळ सोनवणे (५८, राजीव गांधीनगर, धुळे) असे या लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पिंपळनेर येथील एका एंटरप्रायझेसच्या संचालकाने धुळे जि.प. शाळांतील मुलांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत बूट व पायमोजे पुरवले होते. त्याचे ४० लाखांचे बिल प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी पाच टक्केप्रमाणे दोन लाखांची लाच अधीक्षक महेंद्र सोनवणे यांनी मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. धुळ्याच्या पथकाने त्याची पडताळणी करून तथ्य आढळून आले. त्यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक रूपाली खांडवी, कर्मचारी राजन कदम, मुकेश अहिरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, सोनवणेंकडे गेल्या महिन्यात ९ सप्टेंबरला वेतन अधीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती. ३१ ऑक्टोबरला ते निवृत्त होणार होते. त्यानिमित्त एका संघटनेने शनिवारी, २६ रोजी तर निकटवर्तीयांनी ३१ ऑक्टोबरला कार्यक्रम ठेवला होता. तथापि, या कारवाईनंतर वाडीभोकर येथील त्यांच्या राहत्या घराची पोलिसांनी झडती घेतली.