पारोळा । जळगाव जिल्हयातून लाचखोरीच्या मोठी बातमी समोर आलीय. विविध विकास कामांचे केलेले बिल अदा करण्यासाठी आणि दुसऱ्या गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितली म्हणून पारोळा पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्यांसह दोन विस्तार अधिकारी व दोन वरिष्ठ लिपिकांसह एकूण पाच जणांना बुधवारी (ता. २३) अटक करण्यात आली.
गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (वय ५६, रा. मानराज पार्क, जळगाव), विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय ५८, रा. मुक्ताईनगर, जळगाव), विस्तार अधिकारी गणेश प्रभाकर पाटील (वय ५०, रा. मानसिंगकानगर, पाचोरा), वरिष्ठ लिपिक अतुल पंढरीनाथ पाटील (वय ३७, रा. मोंढाळे प्र.अ., ता. पारोळा) व सहायक कार्यक्रम अधिकारी योगेश साहेबराव पाटील (वय ३७, रा. गुलमोहर बाग, पारोळा) अशी संशयितांची नावे आहेत.
कंत्राटादरांनी दलित वस्तीसुधार योजनेंतर्गत सावखेडा होळ (ता. पारोळा) येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे सात लाख व सावखेडा तुर्क गावातील रस्त्यांच्या खडीकरणाचे ६० लाखांचे तीन कामे, शासनाच्या ‘९०-१०’ या हेडखाली ३० लाखांची तीन, अशी एकूण ९० लाखांची सहा कामे घेतली होती.
त्यापैकी सावखेडा होळ गावात केलेल्या कामांचे उर्वरित पैशांचे बिल व सावखेडा तुर्क गावात घेतलेल्या कामांचे कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात गटविकास अधिकारी शिंदे यांनी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली.
उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी तक्रारीची खातरजमा करून सापळ्याचे नियाजेन केले. त्यांच्या पथकातील निरीक्षक स्मिता नवघरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांनी पाचही संशयितांना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिस कोठडीत ठेवले. गुरुवारी (ता. २४) त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करणार आहेत.
जामिनावर सुटका अन् पुन्हा अटक
संशयित सुनील पाटील, योगेश पाटील यांच्यावर गटविकास अधिकाऱ्यांसाठी वर्कऑर्डर काढून देतो, म्हणून एक लाख रुपयांची मागणी व स्वीकार केल्याच्या आरोपात गेल्या २० सप्टेंबरला पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दोन्ही संशयित जामिनावर आहेत. पुन्हा त्याच गुन्ह्यात त्यांना अटक झाली आहे.