पारोळा । पारोळा तालुक्यातील बहादरपूर शिवारात, बोरी नदीच्या काठावर सुरू असलेल्या एका मोठ्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून तो उद्ध्वस्त केला. या कारवाई तब्बल ४० लाख ३३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पारोळा पोलिसांनी ही शिताफीने कारवाई केली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना मिळालेल्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहादरपूर गावाजवळील बोरी नदीच्या काठावर एक लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये टँगो पंच नावाच्या बनावट देशी दारूचा अवैध कारखाना सुरु असल्याची पुष्टी झाली. यानंतर पोलिस पथकासोबत दोन शासकीय पंच घेत अवैध दारू कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी तयार आणि तयार होण्याच्या प्रक्रियेत असलेली मोठ्या प्रमाणात देशी दारू, कच्चा माल, यंत्रसामग्री, वाहने आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले.
कारखान्यात तयार विक्रीसाठी ३१०० सीलबंद बाटल्या (किंमत ₹1.24 लाख), ७०० विक्रीपूर्व अवस्थेतील बाटल्या (₹28,000), ८०० लीटर स्पिरीट (₹3.55 लाख), १५०० लीटर तयार दारू (₹3 लाख), RO व CNC मशिन्स (प्रत्येकी ₹5 लाख), पाणी लिफ्टिंग मशीन, इलेक्ट्रिक स्टॅबिलायझर, ३० हजार टँगो पंच बुच, ६१,२०० रिकाम्या बाटल्या (₹6.12 लाख), विविध आकाराच्या पाण्याच्या टाक्या, मिक्सर मशीन, इलेक्ट्रिक स्टार्टर्स, बोलेरो मालवाहू वाहन (₹5 लाख), स्विफ्ट डिझायर कार (₹5 लाख) तसेच लोखंडी पत्र्याचे ४० बाय ४० फुटांचे शेड (₹5 लाख) असा एकूण ₹40,33,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत पारोळा पोलीस ठाण्याची ही कारवाई अवैध दारू निर्मिती आणि वितरणाच्या विरोधात मोठा दणका मानला जात असून, स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांवर प्रभावी कारवाईचा इशारा या घटनेतून मिळाला आहे.















Discussion about this post