जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव जाणाऱ्या टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाक्यावरील एका सिमेंट व आसारीच्या दुकानावर टँकर धडकला. या अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला. तर रस्त्याने आईसोबत चालत असलेला तरुण शकील अ. नबी बागवान (वय ३५) गंभीर जखमी झाला. त्याला प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान शकीलची आई, भाऊ व वहिनी हे घरात विवाह असल्याने मालेगाव येथे कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास ते एरंडोल बसस्थानकावर उतरले. रिक्षा नसल्याने शकील बागवान याने भाऊ आसिफ नबी तांबोळी यास दुचाकी घेऊन येण्यास सांगितले. आसिफ दुचाकी घेऊन आला व दुचाकीवरून आसिफ व त्याची पत्नी घरी गेले. तर शकील बागवान हा त्याच्या आईसोबत पायी घरी जात होता. आसिफने पत्नीला घरी सोडल्यानंतर आई व भावास घेण्यासाठी येत असताना त्यास नाक्याजवळ नागरिकांची गर्दी दिसल्याने तो थांबला व जवळ जाऊन पाहिले असता, त्याच्या भावाचा अपघात झाल्याचे दिसले.
अपघातात शकील बागवान याच्या दोन्ही पायावरून टँकर गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, टँकरचा अपघात होताच जोरदार आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करून जखमी शकील यास बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका व पोलिसांना माहिती दिली. अपघातग्रस्त टँकर एका झाडाला धडकल्यामुळे तसेच लोखंडी आसाऱ्यांमध्ये अडकल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत आसिफ नबी तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिस ठाण्यात टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.















Discussion about this post