नवी दिल्ली । इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला असून गाझामध्ये उपस्थित असलेल्या हमास या संघटनेने इस्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले आहेत. यामुळे इस्रायलने या हल्ल्याविरोधात युद्धाची घोषणा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबत निवेदन जाहीर करून आम्ही युद्धासाठी तयार असल्याचं इस्रायलने म्हटलंय.
दरम्यान, अमेरिकेने इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिला आहे. हमासने विशेषतः दक्षिण आणि मध्य इस्रायलवर हल्ले केले आहेत. हा हल्ला दक्षिण भागातील लष्करी छावणीवर झाला. हमासने या काळात अनेक इस्रायली सैनिकांनाही ओलीस ठेवले आहे. हमासच्या हल्ल्यात 15 इस्रायली जखमी झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या मते इस्रायलला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे.
तेल अवीववरही रॉकेटने हल्ला करण्यात आला आहे. इस्त्रायली लष्कराची वाहनेही हमासच्या लढवय्यांकडून ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. डझनभर लढाऊ इस्रायली लष्कराच्या छावणीत घुसले आहेत. या काळात अनेक इस्रायली सैनिकांना कैद करण्यात आले आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांनी ट्विट केले की, इस्रायलवर गाझाने केलेला हा संयुक्त हल्ला ज्यूंच्या सुट्टीच्या काळात होत आहे.
हमास सत्तेवर आल्यानंतर इस्रायलने 2007 पासून गाझावर कडक नाकेबंदी लागू केली आहे. तेव्हापासून पॅलेस्टिनी अतिरेकी आणि इस्रायलमध्ये अनेक विनाशकारी युद्धे झाली आहेत. इस्रायल अनेक दिवसांपासून पॅलेस्टिनींवर हल्ले करत आहे. इस्रायली सैन्य दररोज पॅलेस्टिनींच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे प्रचंड विनाश होतो. आतापर्यंत अनेक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. सप्टेंबरमध्ये तणाव वाढल्यानंतर हा संघर्ष सुरू झाला.
Discussion about this post