जळगाव । जळगाव शहरालगतच्या पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गावरील गिरणा नदी पुलाजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. काचेच्या बाटल्यांनी भरलेला कंटेनर अचानक कलंडल्याने मागून येणाऱ्या सहा वाहनांची एकमेकांवर धडक झाली. या अपघातात सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एका ट्रकचालकास दुखापत झाली आहे. अपघातामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाळधीकडून तरसोदकडे काचेच्या बाटल्यांचा माल घेऊन कंटेनर जात होता. नवीन बायपास महामार्गावरील गिरणा नदी पुलाजवळील मोकळ्या रस्त्यावर अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनरचा वेग अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, संतुलन बिघडल्याने कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी आडवा कलंडला.
या घटनेनंतर कंटेनरमधील काचेच्या बाटल्यांचे बॉक्स रस्त्यावर विखुरले गेले. मोठ्या प्रमाणावर काचा फुटल्याने रस्त्यावर काचेचा खच तयार झाला. कंटेनर अचानक आडवा झाल्याने मागून येणाऱ्या वाहनचालकांना वेळीच ब्रेक लावता आले नाहीत. परिणामी एकामागून एक अशी सहा वाहने एकमेकांना धडकली.
या साखळी अपघातात काही कार, मालवाहू ट्रक व हलक्या व्यावसायिक वाहनांचा समावेश असल्याची माहिती आहे. काही वाहनांच्या समोरील भागाचे अतोनात नुकसान झाले असून काचा फुटणे, बोनट दुमडणे व इंजिनला धक्का बसल्याचे दिसून आले.















Discussion about this post