जळगाव | जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पाळधी (ता. जामनेर) परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संतप्त होत महामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडले, त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
मृत व्यक्तीचे नाव उत्तम परदेशी (वय ५४) असे असून, ते पाळधी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाचा अचानक ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या तिघांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
पाळधी गाव महामार्गालगत असल्याने या ठिकाणी वाहनांची मोठ्या वेगाने ये-जा सुरू असते. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये आधीपासूनच नाराजी होती. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर उतरून रास्तारोको केला. परिणामी, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी काही ठोस मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, तसेच परिसरात त्वरित गतिरोधक बसवून वाहनांचा वेग नियंत्रित करावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय महामार्गालगतची अतिक्रमणे २४ तासांत हटवावीत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताबाबत पुढील तपास सुरू असून, प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.















Discussion about this post