जम्मू काश्मीर । जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हरियाणातील कर्नाल येथील रहिवासी आणि भारतीय नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हे शहीद झाले. विनय नरवालचे लग्न ३ दिवसांपूर्वी झाले होते. लग्नानंतर ते काश्मीर फिरायला गेले होते. परंतु अतिरेक्यांनी निर्दयीपणे त्यांच्या पत्नींसमोरच गोळ्या घातल्या आणि एका क्षणात नव्या जीवनातील पहिला प्रवासच अखेरचा ठरला.
बैसरन हे झेलम नदीच्या खोऱ्यातील सुंदर पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे या हंगामात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. दुपारी पर्यटक काश्मीरच्या स्वर्गीय निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत असताना अचानक लष्करी गणवेशातील दोन दहशतवादी आले आणि त्यांनी धर्म जाणून घेण्यासाठी प्रथम पर्यटकांची नावे विचारली. त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करून ते पळून गेले. काही क्षणांपूर्वी जिथे पर्यटन बहरले होते तिथे फक्त आकांत आणि आक्रोश सुरू होता. या हल्ल्यात या हल्ल्यात हरियाणातील चार दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या आणि पत्नीसोबत हनिमूनसाठी गेलेल्या एका भारतीय नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर कानपूरचा तरुण शुभम द्विवेदीचा मृत्यू झाला. शुभम त्याच्या पत्नीसोबत हनिमूनला गेला होता. त्यांचे लग्न २ महिन्यांपूर्वी १२ फेब्रुवारी रोजी झाले होते.
लेफ्टनंट विनयचे चार दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
हरियाणातील करनाल येथील भारतीय नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल (वय २६) यांची त्यांच्या पत्नीसोबत पहलगामला पहिली ट्रिप एन्जॉय करत असताना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. “आम्ही भेळपुरी खात होतो… त्याने माझ्या पतीवर गोळी झाडली… बंदूकधारी म्हणाला हा (माझा पती) मुस्लिम नाही… आणि त्याने गोळी घातली,” असे विनय यांच्या पत्नीने थरथरत्या आवाजात सांगितले. चार दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. १६ एप्रिल रोजी लग्नानंतर लेफ्टनंट नरवाल काश्मीरला गेले होते. तिथेच १९ एप्रिल रोजी रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. कोची येथे तैनात असलेले विनय दोन वर्षांपूर्वीच नौदलात भरती झाले होते. समवयस्क आणि वरिष्ठांमध्ये ते एक समर्पित आणि आशादायक अधिकारी म्हणून ओळखले जात होते, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
मलाही गोळ्या घाला…; शुभमच्या पत्नीचा आक्रोश
शुभमचे वडील संजय द्विवेदी हे सिमेंटचे व्यापारी आहेत. शुभम आज जम्मू आणि काश्मीरहून घरी परतणार होता. जेव्हा दहशतवादी शुभमला मारत होते, तेव्हा त्याच्या पत्नीने दहशतवाद्यांना तिलाही मारण्यास सांगितले, परंतु दहशतवाद्यांनी सांगितले की ते तिला मारणार नाहीत. आम्ही तुम्हाला जिवंत सोडत आहोत जेणेकरून तुम्ही जाऊन तुमच्या सरकारला आम्ही काय केले आहे ते सांगू शकाल. शुभमच्या मृत्यूची बातमी मिळताच घरात कुटुंबियांनी आक्रोश सुरू केला आहे. जसं दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केले आहे आणि आमच्या शुभमला मारले आहे, मोदी सरकारनेही बदला घेतला पाहिजे. आमच्या शुभमचा मृतदेह लवकरात लवकर आमच्या घरी पाठवा, अशा भावना शुभमच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत.
Discussion about this post