पाचोरा । शिक्षकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना पाचोरा शहातील सुपडू भादु विद्या मंदिर शाळेत घडली. रविंद्र भारत महाले असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान विद्यार्थी प्रांगणात खेळत असताना शिक्षक रवींद्र महाले यांनी दुसऱ्या मजल्यावरील वर्ग खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. मधली सुट्टी संपल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत रवींद्र महाले हे वर्गात आढळून आले. शाळा सुरू असतानाच ही घटना घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये ही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मानसिक तणावातून शिक्षकाने टोकाची भूमिका घेतल्याचा अंदाज हा वर्तवल्या जात आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून याप्रकरणी सखोल तपास केला जात आहे.
रवींद्र महाले हे पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील रहिवासी होते. मात्र पाचोरा येथील सुपडू बहादू शाळेत कार्यरत असल्याने गेल्या काही वर्षापासून ते पाचोरा शहरातील गिरणा पंपिंग रोडवर वास्तव्यास होते.
Discussion about this post