पाचोरा । पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. प्रियंका खुशाल भदाण (वय अंदाजे २५-३०) असे मयत विवाहितेचे नाव असून, पती खुशाल भदाणे याने हे कृत्य केल्यानंतर स्वत: गळफास लावण्याचा प्रयत्न करत असतानाच पाचोरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खुशाल भदाणे याला पत्नी प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयावरून आज पहाटे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात खुशालने घरातील कामासाठी वापरण्यात येणाच्या चाकुने प्रियंकाच्या गळ्यावर आणि पोटात सपासप वार केले. या हल्ल्यात प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीचा खून केल्यानंतर खुशाल भदाणे याने स्वतः गळफास लावून आत्महत्येचा प्रयल केला. मात्र, वेळीच घटनेची माहिती मिळाल्याने पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले आणि तात्काळ ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी मयत प्रियंका हिच्या मावशीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये पती खुशाल भदाणे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ हे करीत आहेत.
दरम्यान, ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, परिसरातील नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हे दाम्पत्य काही दिवसांपूर्वीच जारगावमध्ये राहायला आलं होतं आणि त्यांचं वागणं सर्वसामान्य वाटत होतं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, तपासासाठी त्याची कसून चौकशी सुरू आहे.
Discussion about this post