पाचोरा । सोलर फिटिंगच्या कामांच्या ‘रिलीज ऑर्डर’ काढून देण्यासाठी २९ हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा शहरातील वीज कंपनीचा सहाय्यक अभियंता मनोज जगन्नाथ मोरे यास जळगाव एसीबीने आज मंगळवारी दुपारी तीन वाजता कार्यालयातच बेड्या ठोकल्या आहेत. एसीबीच्या या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी एका ३२ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली होती. तक्रारदार यांचा सोलर फिटिंगचा व्यवसाय असून, त्यांनी महावितरणकडे तीन नवीन प्रकरणे ऑनलाइन सादर केली होती. या तीन प्रकरणांची ‘रिलीज ऑर्डर’ काढून देण्यासाठी सहायक अभियंता मनोज मोरे याने प्रति प्रकरण ३ हजार रुपये असे एकूण ९ हजार रुपयांची मागणी केली होती. याव्यतिरिक्त, मोरे याने यापूर्वीच काढून दिलेल्या २८ प्रकरणांच्या ‘रिलीज ऑर्डर’साठी ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. अशा प्रकारे त्याने एकूण ७९ हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने ११ ऑगस्ट २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून तक्रार दाखल केली. पडताळणीदरम्यान, सहायक अभियंता मोरे याने नवीन तीन प्रकरणांसाठी ९,००० रुपये आणि मागील २८ प्रकरणांसाठी ‘वन टाइम पेमेंट’ म्हणून ७० हजार रुपयांपैकी ३० हजार रुपये मिळाल्याचे सांगितले. उर्वरित ४० हजार पैकी आज २० हजार रुपये आणि चालू असलेल्या तीन प्रकरणांचे ९ हजार असे एकूण २९ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
या माहितीनंतर आज (१२ ऑगस्ट २०२५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक अभियंता मनोज मोरे याच्या कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले. मोरे याने स्वतः तक्रारदाराकडून लाचेची २९,००० रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी केली. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Discussion about this post