पाचोरा । भारतात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. नागरिकांना विविध प्रकारे गंडविले जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशातच मोठ्या वस्तूंच्या लकी ड्रॉचे आमिष दाखवून नागरिकांना फसवित लाखो रुपये घेऊन पोबारा करणाऱ्या तीन जणांना पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुंडलिक सांडू कदम (वय ४०, रा. तिडका, ता. सोयगाव), स्नेहल दत्तात्रय नरोटे (३८, रा. कोल्हार, ता. राहुरी) आणि त्याचा भाऊ श्रेयस नरोटे (२८) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जणांची नावे आहेत.’श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस’ या नावाखाली १५०० रुपयांचे कूपन देऊन या कंपनीच्या संचालकांनी लाखो रुपये पाचोरेकरांकडून लुटले. शहर व तालुक्यात पाच हजारावर कूपन वितरण करुन पैसे जमवले. या कंपनीकडून शुक्रवारी वरखेडी रोडवरील एका खासगी लॉन्सवर सोडतचे आयोजन केले होते. या ठिकाणी संचालक अरुण आहेर, फरीद शेठ, आकाश पाटील, संजय पाटील, पुंडलिक कदम, मिलिंद संसारे, दिनेश व्यवहारे, ज्ञानेश्वर जेटे हे हजर होते.
मात्र लोकांचा जमाव पाहून तिथून पळ काढला. याप्रकरणी ज्ञानेश्वर चिंतामण खैरनार (रा. शेवाळे, ता. पाचोरा), किरण निंबा चौधरी (पाचोरा), मधुकर चंदने (रा. निंभोरी बुद्रुक), राजेंद्र सांडू पाटील (रा. लोहारी बुद्रुक) यांनी पाचोरा पोलिसात तक्रार दिली आहे. लकी ड्रॉ संदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. योग्य चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती अशोक पवार, पोलिस निरीक्षक यांनी दिली आहे.
Discussion about this post