पाचोरा । जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढताना दिसत असून ही चिंताजनक बाब आहे. अशातच पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. अरुण शहादु पाटील (वय वर्षे ४८) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अरुण पाटील यांच्याकडे १ हेक्टर १६ आर कोरडवाहू शेतजमीन आहे. मागील दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतात जेमतेम उत्पन्न आले. मात्र शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय डबघाईस आला होता. त्यातच कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी मयत अरुण पाटील यांना कर्ज काढणे गरजेचे होते.
म्हणून त्यांनी शेतावर पिक कर्ज, गावातील पतसंस्थेचे कर्ज तसेच बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. परंतु कोरडवाहू शेतीत येणारे उत्पन्न शेतमालाला कवडीमोल भाव यात आर्थिक बजेट कोलमडून नशिब साथ देत नसल्याने सरते शेवटी अरुण पाटील यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Discussion about this post