जळगाव । पाचोरा आणि भडगाव तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे ज्वारी, बाजरी व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
भडगावसह बाळद, नगरदेवळा, खडकदेवळा, यावल, जुवार्डी, वाघड्डू आणि गुढे, आदी ठिकाणी पाऊस झाला. बाळद, (ता. पाचोरा) परिसरात रब्बी हंगाम हा शेवटच्या टप्प्यात होता. सायंकाळी झालेल्या वादळी वारे व पावसामुळे केळीला फटका बसला आहे. गुढे परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काढणीला आलेली ज्वारी, बाजरी, काही ठिकाणी साठवून ठेवलेला कांदा पूर्णतः मातीमोल झाला आहे. वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाखाली कैरींचा जणू सडा पडलेला होता. त्याचबरोबर लिंबू बागांनादेखील मोठा फटका बसला आहे. नगरदेवळासह परिसरातही सायंकाळी १५ मिनिटे वादळासह जोरदार पाऊस झाला. खडकदेवळा (ता. पाचोरा) परिसरात गुरुवारी संध्याकाळी अचानकपणे आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
वीज पडून तरुणाचा मृत्यू
चोपडा : तालुक्यातील मालापूर येथील रहिवासी रेवसिंग दिलीप पावरा (२८) याचा मध्य प्रदेशातील धावड (जि. बडवाणी) येथे अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. रेवासिंग हा आपल्या सासरी गेला होता. रेवसिंग हा जळगाव येथील विधी महाविद्यालयात एल.एल.बी.च्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याच्यावर शुक्रवारी मालापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.















Discussion about this post