यावल । स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्यानंतर त्यापोटी बक्षीस म्हणून एक लाख रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या यावल तालुक्यातील चुंचाळे गावातील ग्रामसेवक आणि डीडीपी ऑपरेटर याला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी रा.साकळी ता.यावल आणि ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (वय-३५) रा. चुंचाळे ता.यावल असे लाचखोर संशयित आरोपींची नावे आहेत. हा सापळा शनिवार, 17 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला.
चुंचाळे येथील 46 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, चुंचाळे, ता.यावल गावी त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये 15 वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करण्यासाबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मंजूर निधीतून तब्बल 50 टक्के बक्षीस म्हणून एक लाखांची लाच ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी शुक्रवार, 16 रोजी मागितली होती. तक्रारदाराने याबाबत शुक्रवारी जळगावी तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली.
शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्यानंतर ग्रामसेवकाने लाचेची रक्कम ऑपरेटर यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितल्यानंतर ऑपरेटर सुधाकर कोळी यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली तर ग्रामसेवक हेमंत जोशी यांना सापळ्याबाबत कुणकुण लागताच ते पसार झाले. दोघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा ददाखल करण्यात आला.
Discussion about this post