जळगाव: जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याने पक्षाचे वरिष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांना खुले पत्र लिहून जोरदार चर्चा सुरू केली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी यांनी लिहिलेल्या या पत्रात त्यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी राजकीय तडजोड केल्याचा आरोप केला आहे. चौधरी यांनी पत्रात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत, पक्षातील कार्यकर्त्यांना दिला जाणारा न्याय, तिकीटवाटपातील निर्णय आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी होत असल्याचे मुद्दे उठवले आहेत.
चौधरी यांनी लिहलं आहे की, जळगाव तालुक्यातील कार्यकर्ते पक्षाचे काम करत असताना आम्हाला वारंवार असे जाणवते की, नामदार गुलाबराव पाटील आणि तुमच्यात एक अघोषित करार झाला आहे. “तुम्ही जामनेरमध्ये शिवसेना वाढवू नका, आम्ही जळगाव ग्रामीणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला बळ देणार नाही,” अशा पद्धतीचे हे राजकारण चालले आहे. जर हे खरं असेल, तर मग त्या सामान्य कार्यकर्त्याचा काय दोष ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य पक्षासाठी अर्पण केलं? कार्यकर्त्यांनी बोलावलेल्या कार्यक्रमांना जाणीवपूर्वक टाळणं, हे एका लोकनेत्याला साजेस आहे का? असा सवाल चौधरी यांनी केला आहे.
तसेच चौधरी यांनी मोठा आरोप केला. मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील काही सामान्य कार्यकर्त्यांऐवजी भू-माफिया, भांडवलदार, भ्रष्टाचारी आणि पक्ष बदलणाऱ्यांना महत्व दिले आहे. तसेच, जळगाव महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत काही “आयाराम-गयाराम” ने पक्षाची सत्ता उलथवून टाकली, परंतु त्यांना पक्षात स्थान देण्यात आले, असे त्यांनी म्हटलं आहे.
हर्षल चौधरी यांनी थेट विचारले की, “जर जळगाव तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांना बळ देण्यात आलं नाही आणि गुलाबराव पाटील यांच्यासोबत अघोषित करार चालत असेल, तर सामान्य कार्यकर्त्यांचा दोष काय?”
पत्रात पर्यावरण, रोजगार, शेती, शाश्वत विकास या विषयांवरील धोरणावरही मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. हर्षल चौधरी यांनी पत्राचा शेवट करताना म्हटले आहे की, “हे पत्र टीका म्हणून नाही, तर तुम्हातील जुन्या लोकनेत्याला साद घालण्यासाठी आहे; सत्तेच्या झगमगाटात कार्यकर्त्यांचा अंधार होऊ देऊ नका.” असं म्हटलं आहे.















Discussion about this post