मुंबई: देशात डिजिटल व्यवहारांचा वेग जितका वाढला आहे, तितकीच सायबर फसवणुकीची भीतीही वाढली आहे. हीच फसवणूक रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आता ५ सुरक्षित बिंदूंवर आधारित एक महत्त्वाचा प्रस्ताव तयार केला आहे. या नव्या नियमांमुळे ऑनलाईन पेमेंटची पद्धत पूर्णपणे बदलणार असून, ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आता व्यवहाराला थोडा अधिक वेळ लागणार आहे.
२८ लाख फसवणुकीच्या घटनांनी उडवली झोप
नॅशनल सायबर क्राईमच्या ताज्या अहवालानुसार, २०२५ मध्ये तब्बल २८ लाख डिजिटल फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशातून सुमारे २२,९३१ कोटी रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, १० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांमध्ये ही चोरी सर्वाधिक झाली आहे. यामुळेच आरबीआयने आता कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
काय आहे RBI चा मास्टर प्लॅन?
१. १० हजारांवरील पेमेंटसाठी ‘एक तास’ वेटिंग:
नव्या नियमानुसार, जर तुम्ही १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम कोणाला पाठवली, तर ती रक्कम तुमच्या खात्यातून वळती होईल, मात्र समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा व्हायला १ तास लागेल. या एक तासाच्या काळात जर तुम्हाला फसवणुकीची शंका आली, तर तुम्ही तो व्यवहार रद्द करू शकता.
२. सिंगल क्लिकवर व्यवहार बंद (Kill Switch):
जर तुमची फसवणूक होत असल्याचे तुमच्या लक्षात आले, तर एका सिंगल क्लिकवर तुम्ही तुमचे UPI, नेट बँकिंग आणि डेबिट/क्रेडिट कार्ड व्यवहार तात्काळ बंद करू शकाल.
३. संशयास्पद खात्यांवर करडी नजर:
आरबीआय आता अशा बँक खात्यांचा शोध घेणार आहे, ज्यामध्ये अचानक मोठी रक्कम जमा होऊ लागली आहे. अशा खातेदारांची चौकशी केली जाईल आणि ई-केवायसी (e-KYC) न जुळल्यास ती खाती तातडीने गोठवली जातील.
मिश्र प्रतिक्रिया: कोणी केले स्वागत, तर कोणी फिरवले नाक!
आरबीआयच्या या प्रस्तावावर जनतेमध्ये दोन गट पडले आहेत. अनेक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून “उशिरा मिळाले तरी चालेल, पण पैसा सुरक्षित हवा,” अशी भावना व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, ज्यांना आपत्कालीन स्थितीत तात्काळ पैशांची गरज भासते, त्यांनी या ‘एक तासाच्या’ नियमावर नाराजी दर्शवली आहे.















Discussion about this post