जळगाव । यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. नव्या मुदत वाढीनुसार आता उमेदवारांना १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध असणार आहे.
यापूर्वी देण्यात आलेली मुदतवाढ ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आल्याने आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुक्त विद्यापीठामार्फत विविध अभ्यासक्रमांसाठी १ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टण्यात ३१ जुलैपर्यंत या प्रवेशांसाठी मुदत देण्यात आली होती.
त्यानंतर दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली; मात्र पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर आता १५ सप्टेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केल्याची माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली. त्यामुळे आणखी १५ दिवसांची वाढ केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना विनाविलंब शुल्क भरून प्रवेश घेता येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाच्या संचालकांनी दिली. संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांनी प्राप्त करून घ्यावी. त्यामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे निर्धारित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करावा, असे कळवण्यात आले आहे.
Discussion about this post