अमळनेर : होळीच्याच दिवशी सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमळनेर तालुक्यातील तालुक्यातील पिंपळी येथे घडली. सणाच्या दिवशी ही घटना घडल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. दिलीप नामदेव पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी दिलीप पाटील यांच्या घरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी आले.
यातच घराचे संपूर्ण छत लाकडी असल्याने आणि घरात कापूस साठवून ठेवला असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. आगीने संपूर्ण घर जळत असताना दिलीप पाटील यांच्या पत्नी, मुलगा आणि नात तातडीने घराच्या बाहेर पळत आले. मात्र आगीमुळे दिलीप पाटील यांना चक्कर आल्याने ते घरात अडकून पडले. आगीने संपूर्ण घर ताब्यात घेतल्याने श्री. पाटील यांना बाहेर पडता आले नाही. घराला आग लागल्याचे समजताच स्थानिकांना मिळेल त्या साधनाचा वापर करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही.
घटनेची माहिती अमळनेर अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोचत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत दिलीप पाटील यांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक विकास देवरे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी येत दिलीप पाटील यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
Discussion about this post