मुंबई । सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत बुधवारी (09 ऑक्टोबर) रात्री 86 व्या वर्षी निधन झालं. ब्रिच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनाने देशासह उद्योगक्षेत्रात शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे.
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवारी 10 ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा असेल. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव दुपारी 3.30 वाजता अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. यानंतर संध्याकाळी 4 वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन ही अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीत पोहचेल. यानंतर सायंकाळी 4.30 वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील.
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यानंतर सकाळी 10 वाजता हलेकाय येथून त्यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. यानंतर सकाळी 10 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए या ठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक 2 मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल.
Discussion about this post