एकीकडे राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असून अशातच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचं समोर आलेय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. सादिक उर्फ बाबू कपूर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पुण्यातील हडपसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ५६ वर्षीय सादिक यांनी हडपसरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार त्रास देत असल्याचा आरोप करत आत्महत्या केलीय. या घटनेनंतर हडपसर आणि पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलिसांकडून या आरोपात किती तथ्य आहे? याचा तपास केला जात आहे.
पुण्यातील लष्कर भागात असलेल्या ऑफीसमध्ये गळफास घेऊन सादिक उर्फ बाबू कपूर यांनी आत्महत्या केली. लष्कर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्या कराण्याआधी सादिक कपूर यांनी त्यांच्या हातावर आणि कागदावर सुसाइड नोट लिहिली होती. यामध्ये अनेकांची नावे आहेत. त्यातील एक नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हडपसर भागातील उमेदवार फारुख शेख यांचे आहे. सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीच्या वादातून ही आत्महत्या झाली असल्याचं प्राथमिक माहिती आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर आधी मोका कायद्या अंतर्गत कारवाई झालेली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.















Discussion about this post