भुसावळ : शहरातील एम.ओ.एच.कॉलनी परीसरातील हॉटेल मधूबनजवळगोपनीय माहितीच्या आधारे गावठी पिस्टल विक्री व खरेदी करणार्यावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई केली. यात एका संशयिताला बेड्या ठोकत त्याच्याकडून 60 हजार रुपये किंमतीचे दोन पिस्टल जप्त केले आहेत तर शस्त्र विक्री करणारा भुसावळातील संशयित मात्र पसार झाला आहे.
योगेश नंदू सांगळे (29, छत्रपती संभाजीनगर) या शस्त्र खरेदी करणार्यास अटक करण्यात आली तर बंटी उर्फ पवन झरापकर (भुसावळ) हा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाला. बाजारपेठ पोलिसांना शस्त्र तस्कराबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. एम.ओ.एच.कॉलनी परीसरातील कच्चा रोडच्या बाजूला असलेल्या हॉटेल मधूबनजवळ संशयित योगेश सांगळे हा स्कॉर्पिओतून आल्यानंतर संशयित झरापकर हा दुचाकीवरून आला व त्याने आपल्याजवळील दोन गावठी कट्टे सांगळे यास दिल्यानंतर सापळा रचून असलेल्या सांगळे यास ताब्यात घेतले तर झरापकर हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
संशयिताला एका दिवसाची कोठडी
पोलिसांनी 60 हजार रुपये किंमतीचे दोन पिस्टल, चार लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ (एम.एच.14 बी.के.9094), 40 हजार रुपये किंमतीची होंडा ग्लॅमर (एम.एच.19 बी.एल.1944) व दिड हजारांची रोकड मिळून पाच लाख एक हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. कॉन्स्टेबल सागर वंजारी यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयिताला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Discussion about this post