चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे दिवसाढवळ्या झालेल्या एका घरोफोडीचा मेहुणबारे पोलिसांनी अवघ्या ६ तासांत छडा लावला आहे. पोलिसांनी एका आरोपीसह त्याच्याकडून लंपास केलेला सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील रहिवासी दीपक नामदेव पाटील हे आपल्या कुटुंबासह दिनांक १६ ते १८ मे दरम्यान लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी शोकेसमधील लॉकर तोडून चोरट्याने ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
पाटील यांनी २० मे रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, राजेशसिंह चंदेल यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार, प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण अ. दातरे यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांचे एक पथक तयार केले.
या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत, अवघ्या ६ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला. अभिलेखावरील सराईत आरोपी प्रवीण सुभाष पाटील (वय ३२, रा. बिलवाडी, ता. जि. जळगाव) याला या प्रकरणात निष्पन्न करून अटक करण्यात आली. न्यायालयाकडून पोलीस कोठडी रिमांडमध्ये घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने एका सराफाकडून वितळवून घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वितळवलेल्या सोन्याची ३३ ग्रॅम वजनाची, ३ लाख २० हजार रुपये किमतीची लगड आरोपीकडून जप्त केली आहे.
ही यशस्वी कामगिरी प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण अ. दातरे, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, सुहास आव्हाड, पोहेकॉ गोकूळ सोनवणे, किशोर पाटील, शांताराम पवार, पोकॉ विनोद बेलदार, संजय लाटे, निलेश लोहार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली केली आहे.
Discussion about this post