जळगाव । जळगाव शहरातील समस्यांबाबत भाजपचे नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी साखळी उपोषण सुरू असून महापालिका प्रशासन अकार्यक्षम असून, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड कामाचे नियोजन करीत नसल्याचा आरोप आहे. यातच बहुतांश नगरसेवकांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याविरोधात महापौर जयश्री महाजन यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दिला आहे. येत्या १ ऑगस्टला त्यावर मतदान घेण्यासाठी महासभा होणार आहे.
डॉ. सोनवणे यांच्या उपोषणामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या मनातील असंतोष व्यक्त केला. त्यामुळे प्रशासनावर कारवाई करण्यासाठी आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याची चर्चा नगरसेवकांत सुरू झाली. त्याला शुक्रवारी (ता. २७) बहुतांश नगरसेवकांनी पाठिंबा देत प्रस्ताव महापौरांकडे सादर केला आहे.
आयुक्तांच्या कामावर अविश्वास दाखविणाऱ्या प्रस्तावावर तब्बल ५६ नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या करून शुक्रवारी सांयकाळी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे दाखल केला. महापौरांनी हा प्रस्ताव मान्य करून तो विधी शाखेकडे पाठविला. त्यांचे मार्गदर्शन घेऊन १ ऑगस्टला मतदानासाठी सभा घेण्याबाबत त्यांनी नगरसचिवांना कळविले.