मुंबई । भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली. काही जणांकडून नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी देखील केली जात होती. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी नितेश राणेंवर टीका केलीय. नितेश राणे यांचा ‘वेडा आमदार’ असा उल्लेख प्रकाश आंबेडकरांनी केला.
प्रकाश आंबेडकरांनी नितेश राणेंच्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बोलतांना त्यांना फार महत्त्व देऊ नये असं म्हटलंय. नितेश राणे यांचा उल्लेख त्यांनी ‘वेडा आमदार’ असा केलाय. त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाहीय. यासोबतच पोलिसांनी आणि जनतेनेही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.
“नितेश राणे यांच्यावर कारवाई होऊ शकते. पण पोलिसांनी कारवाई करु नये. दुर्लक्ष करावं. एक वेडा आमदार म्हणतोय, असं म्हणावं आणि सोडून द्यावं. त्याचे परिणाम पुढे घातक होतील असं मला तरी वाटत नाही. ते व्यक्तीमत्वावर अवलंबून असतं. त्यामुळे या वक्तव्याकडे दुर्लक्ष करावं”, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
पोलीस स्वत:ला संकटात टाकून, आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत असतात. ते सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात. पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय. असं असताना आता प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केलीय.
Discussion about this post