मुंबई । एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचं रणधुमाळी सुरु असताना अनेक पक्षातील नेते पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या (23 ऑक्टोबर) संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा खुद्द निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. आज निलेश राणे यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. “नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार” असल्याचे निलेश राणे म्हणाले.
“मी २०१९ ला नारायण राणे साहेबांसोबत भाजपमध्ये आलो. इथे खूप सन्मान मिळाला. अनेक नेत्यांनी आदर दिला. प्रेम दिलं. इथे शिस्त पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी लहान भावाप्रमाणे सांभाळलं. रवींद्र चव्हाण यांनी ही लहान भावाप्रमाणे वागणूक दिली. सगळ्याच नेत्यांनी चांगली वागणूक दिली”, असे निलेश राणे म्हणाले.
दरम्यान निलेश राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. निलेश राणे हे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या संध्याकाळी ४ वाजता निलेश राणेंचा पक्षप्रवेश होणार आहे.















Discussion about this post