यंदा मान्सून केरळात वेळेपूर्वीच दाखल झाल्यानंतर राज्यात अवघ्या काही तासात दाखल झाला होता. यांनतर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने दाणदाण उडविली होती. अनेक ठिकाणी मे महिन्यात नदी नाल्यांना पूर आला. तर अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यात पावसाने उसंती घेतल्याचं चित्र आहे. पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर अत्यल्प राहणार असून, 6 ते 10 जून दरम्यानही पावसाची स्थिती साधारणच असेल. असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. वाऱ्यांचा वेगही कमी झाला असून, पुढील 10 ते 15 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सूनचा पाऊस लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.
राज्यात गेल्या आठवड्यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. मात्र आता पावसाचं प्रमाण या आठवड्यामध्ये कमी होणार्या साधारणपणे गेल्या आठवड्यापेक्षा खूपच कमी प्रमाण असणार आहे. मे महिन्यात सरासरीपेक्षा 10 पटीने अधिक पाऊस झाल्याने शेतशिवारात चिखल झाला आहे. याचा परिणाम खरीप हंगामापूर्वीच्या मशागतींवर झाला असून, शेतकऱ्यांना मशागत न करताच ‘वाफसा’ येण्याची वाट पाहावी लागत आहे. काळ्या, खोल जमिनीत पेरणीयोग्य वाफसा येण्यासाठी किमान 10 ते 15 दिवस लागतात. मात्र, पुढेही पाऊस सुरू राहिल्यास पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
हवामानातील या बदलांमुळे शेतकऱ्यांपुढे नवे आव्हान उभे आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी मशागतीसाठी पुरेसा वेळ आणि योग्य हवामान मिळणे गरजेचे आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, पेरणीच्या नियोजनासाठी स्थानिक हवामान अंदाजांचा आधार घेण्याचे आवाहन केले आहे. येत्या काही दिवसांत हवामानातील बदलांवर शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात मान्सूनला ब्रेक, कोकणात तुरळक पावसाची शक्यता
महाराष्ट्रात वेगाने दाखल झालेल्या मान्सूनच्या आगेकुचीला ब्रेक लागला आहे. कोकण किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने पावसाचा जोर ओसरला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत कमी दाबाचा प्रभाव आणखी कमी होईल. यामुळे कोकणात पुढील तीन दिवस केवळ तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तीव्र उष्णतेच्या झळा कायम राहतील. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पाऊस जवळपास गायब झाला आहे.
Discussion about this post