नवी दिल्ली । कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातूनच चालवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी (ता. २४) केजरीवाल यांनी तुरुंगातून पहिला आदेश जारी करत आपल्या मंत्र्यांना काही सूचना दिल्या आहेत. मात्र, या आदेशानंतर केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कारण, अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या कोठडीत असताना त्यांनी जारी केलेल्या सरकारी आदेशाची तपास यंत्रणेने दखल घेतली आहे. केजरीवाल यांनी तुरुंगातून सरकार चालवण्याचा घेतलेला निर्णय आणि जारी केलेला आदेश पीएमएलए कोर्टाने दिलेल्या आदेशाच्या कक्षेत आहे का? याची तपासणी ईडीचे अधिकारी करणार आहेत. कोठडीदरम्यान सरकार चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांवर केजरीवाल स्वाक्षरी करू शकतात का? या बाबीची देखील ईडी अधिकारी माहिती घेत आहेत. सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार केजरीवाल यांना फक्त त्यांच्या पत्नी आणि स्वीय सहाय्यकच भेटू शकतात.
केजरीवाल यांना भेटण्यासाठी फक्त अर्धा तासांची वेळ देण्यात आली आहे. पत्नी सुनीता केजरीवाल आणि स्वीय सहाय्यक बिभव कुमार दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत अरविंद केजरीवाल यांना भेटू शकतात. इतर कोणत्याही व्यक्तींना केजरीवाल यांची भेट घेण्याची परवानगी नाही.
ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातूनच दिल्ली सरकार चालवण्याचा निर्णय घेतला. रविवारी त्यांनी ईडीच्या कोठडीतून पहिला आदेश जारी केला. हा आदेश जल मंत्रालयाशी संबंधित आहे. केजरीवाल यांनी जलमंत्री आतिशी यांना दिल्लीतील अनेक भागातील पिण्याचे पाणी आणि गटार समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.
Discussion about this post