जळगाव । दुचाकीवरून आपल्या चौदा वर्षीय मुलाला घेऊन नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या पित्याचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार फेकला गेल्याने जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला मुलगा गंभीर जखमी आहे. सदरचा अपघात जामनेर तालुक्यातील नेरी गावाजवळ घडला.
धरणगाव तालुक्यातील वराड येथील समाधान वना चौधरी (वय ४०) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. समाधान चौधरी त्यांची पत्नी व तीन मुलांसह वराड येथे वास्तव्याला होते. दरम्यान रविवारी दुपारी एकला ते मुलगा दुर्गेशला घेऊन पहूर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीने जात होते. मात्र, नेरी गावानजीक आले असताना समोरून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार समाधान चौधरी हे जागीच ठार झाले. तर मुलगा दुर्गेश गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर जखमी दुर्गेशला जळगावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर समाधान चौधरी यांचा मृतदेह जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वराड येथील ग्रामस्थांसह नातेवाईकांनी जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. समाधान चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.















Discussion about this post