मुंबई । जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही घोषणा केली. यामुळे आगामी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ते सत्ताधारी आघाडीचे उमेदवार असतील.
भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उमेदवार निवडण्याचे अधिकार देण्यात आले होते. नड्डा म्हणाले की, ‘आम्ही इच्छितो की पुढचा उपराष्ट्रपति सर्वानुमते निवडला जावा. यासाठी आम्ही विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करत आहोत.’
भाजपचा प्रयत्न आहे की, विरोधकांनी आपला उमेदवार उभा करू नये, जेणेकरून निवडणूक बिनविरोध होईल. उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट आहे. जर विरोधकांनी उमेदवार उभा केला, तर 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होईल. लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या निर्वाचक मंडळात NDA कडे स्पष्ट बहुमत असल्याने, त्यांच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे.















Discussion about this post