मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाच्या गोटातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या गटाला रायगड जिल्ह्यात मोठं खिंडार पडणार आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.
राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडींचा एक भाग म्हणून प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी पावलं टाकत आहे. त्यासाठी इतर पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांना आपल्या पक्षात सामावून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती मिळत आहे.
सुरेश लाड हे शरद पवार यांच्या गटात होते. खरंतर सुरेश लाड आणि अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. पण नंतर त्यांच्यात राजकीय मतभेद झाले. त्यामुळे सुरेश लाड हे शरद पवार गटात होते. त्यानंतर त्यांनी आता भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय शरद पवार गटासाठी धोकादायक ठरु शकतो. कारण त्यांच्यासह कर्जतचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष हे सुद्धा भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे शरद पवार गटाला कर्जतमध्ये मोठं खिंडार पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Discussion about this post