सोलापूर : आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. मात्र, त्यापूर्वीच राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
यांनी केला प्रवेश?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यसनमुक्ती सेलचे शहराध्यक्ष ज्योतिबा गुंड, शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष गणेश छत्रबंद यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष, व्यसनमुक्ती सेलचे सरचिटणीस, शहर चिटणीस यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला.
मागील सहा महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शहरात मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्याआधीच संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गेल्या काही महिन्यांपासून मजबूत होताना दिसत आहे. इतर पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याऐवजी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या प्रचंड घटली आहे. शिंदे गटात खास करून ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतून येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्याांची संख्या अधिक आहे. त्यातुलनेत काँग्रेसला फारशी झळ बसलेली नाही.
Discussion about this post