केंद्रात एनडीएचे तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले असून मंत्र्यांचं खातेवाटपही झाले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला स्थान न अजित पवार गट नाराज असल्याचे समोर आल्यानंतर भाजपने ही नाराजी दूर करण्यासाठी एक फॉर्म्युला शोधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला. त्यांना संसदेत मागील दाराने पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली आहे. त्या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ऑफर देण्यात आली होती. पण ही बोळवण असल्याचे लक्षात येताच, ज्येष्ठतेचे कारण देत अजित पवार गटाने त्याला नकार दिला होता.
दरम्यान भाजप कोट्यातून राष्ट्रवादीचा एक नेता राज्यसभेवर पाठविण्याची चर्चा रंगली होती. सुनेत्रा पवार यांचा अर्ज प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागी भरण्यात आला आहे. त्यामुळे एका जागेचा सस्पेन्स कायम आहे. तर नुकताच राष्ट्रवादी स्थापना दिवसाचा कार्यक्रम झाला त्यावेळी अजित पवार यांनी राज्यसभेसंबंधी एक वक्तव्य केले. त्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. आमच्या पक्षाचे दोन नेते राज्यसभेत जातील, असे अजित पवार म्हणाले होते. राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता दुसरी व्यक्ती कोण? असा सवाल विचारण्यात येत आहे. छगन भुजबळ नाराज असल्याचे बोलले जाते. त्यांनी मात्र नाराज नसल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी दुसरे नाव कुणाचे असेल याची उत्सुकता आहे.















Discussion about this post