जळगाव । राष्ट्रवादीचे नेते आमदार नवाब मलिकांना शुक्रवारी कोर्टाकडून जामीन मिळाला असून यांनतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर शरद पवारांचे खूप उपकार आहेत. त्यांनी त्यांना अनेक ठिकाणी संधी दिली. मंत्री केले. त्यांनीही पक्षासाठी प्रचंड मेहनत केली. त्यामुळे ते शरद पवार यांच्या सोबत राहतील असे मला वाटते. पण भाजप नवाब मलिक यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर देऊ शकते.
नवाब मलिक यांना भाजपात येण्यासाठीच जामीन मंजूर करण्यात आल्यासंबंधीच्या प्रश्नावर खडसे उत्तरले की, याची मला कल्पना नाही. पण त्यांना भाजप ऑउफर देऊ शकते. एकनाथ खडसे म्हणाले, भारतीय जनता पार्टीकडे वॉशिंग मशीनपेक्षाही भारी मशीन आहे. त्या मशीनमध्ये जर माणूस घातला तर तो स्वच्छ होतो. तो माणूस कितीही घाणेरडा असला, भ्रष्ट असला तरी तो त्यात घातला की स्वच्छ होतो, प्रामाणिक होतो. मग हे लोक (भाजपा नेते) त्या माणसाचं, त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करतात, त्याला मंत्रिमंडळात स्थान देतात.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नवाब मलिक यांच्या जामिनावर संशय व्यक्त केला आहे. नवे इंजेक्शन मिळाल्यामुळे मलिक यांना जामीन मिळाल्याचे राऊत म्हणालेत.