जळगाव : भारतीय कृषी क्षेत्रात नैसर्गिक संसाधनाचे जतन करून अधिकाधिक फलोत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. मजूरांचा अकार्यक्षम वापर वाढत आहे. यामुळे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. भवरलाल जैन यांनी शेती आणि शेतकऱ्यांना कायमच महत्त्व दिलं आणि त्याअनुषंगाने त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या विधायक कार्याच्या सकारात्मक लहरी आजही इथं अनुभवायास मिळतात. महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या मार्गानेच शेतकऱ्यांची सेवा केली. नवनवीन प्रयोग करून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्याचा प्रयत्न केला. भगवान महावीर यांच्या श्रद्धा, ज्ञान आणि वर्तन या त्रिसुत्रीवर भवरलाल जैन यांनी आपले आयुष्य समर्पित केले. असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव व डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांनी राष्ट्रीय फलोद्यान परिषदेच्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.
नवीदिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचा रविवारी (ता.२८) प्रारंभ झाला. येत्या मंगळवारपर्यंत (ता. ३०) ही परिषद सुरू राहणार आहे. परिषदेत देशातील १०० शास्त्रज्ञ बारा आयसीएआर केंद्रांचे संचालक सहभागी झाले आहेत.
उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, कृषी शास्त्रज्ञ निवड बोर्डाचे सदस्य डॉ. मेजर सिंग, इस्त्राईल येथील लसूण शास्त्रज्ञ एइर इशेल, इस्त्राईलचे आंतरराष्ट्रीय सिंचनतज्ज्ञ अॅम्नोन ऑफेन, चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, माजी सनदी अधिकारी तथा कृषितज्ज्ञ डॉ. अशोक दलवाई, झारखंडच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ. विशाल नाथ, फ्युचर अग्रीकल्चर लीडर्स इन इंडिया (फाली) च्या संचालिका नॅन्सी बेरी, परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आय. एम. मिश्रा, जुनागड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. आर. पाठक, उत्तर बंगा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. के. चक्रवर्ती आदी उपस्थित होते.
नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून शाश्वत विकास साधता येतो, त्या दिशेने जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी ‘सार्थक करूया जन्माचे, रूप पालटू वसुंधरेचे’ याप्रमाणे कार्य केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ८० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल केला आहे. नव्या पिढीने शेतीकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. या पुढील काळात शेतीसाठी ड्रोन, सॅटेलाईट, स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर व्हायला हवा. यासह तरुणाईने देखील शेतीमध्ये सामर्थ्यांने पुढे यायला हवे, असे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले.डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन झाले.
प्रास्तावीक डॉ. एच. पी. सिंग यांनी केले. यात त्यांनी कृषिक्षेत्रातील भविष्यातील उद्दिष्टे विशेषत: फळबागांमध्ये संशोधन आणि विकास यावर भर देण्यासाठी ही परिषद महत्त्वाची असल्याचे सांगितले. नॅन्सी बॅरी, डॉ. इंद्रमणी मिश्रा, डॉ. एस. के. चक्रवर्ती, डॉ. मेजर सिंग, डॉ. ए. आर. पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘शोध चिंतन-२०२३’ या शोधप्रबंधाची १५ वी आवृत्ती, सारांश पुस्तक, मागील वर्षातील इतिवृत्त व सीडी यांचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. विशाल नाथ यांनी आभार मानले. गुरूवंदना दिपक चांदोरकर यांनी सादर केली. डॉ. सुब्रम्हन्या यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान उद्या दि. २९ मे ला ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन कार्यशाळा व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या दोन विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये केळी उत्पादकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीचे सचिव के. बी. पाटील यांनी केले आहे.