नाशिक । स्वतःला कॉस्मोलॉजी तज्ज्ञ आणि भविष्यवक्ता म्हणवणाऱ्या ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांचा मोठा भंडाफोड झाला आहे. ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत खरातला अटक केली असून तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिला भविष्याची भीती दाखवत अत्याचार केला. या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्याच्या कार्यालयातून गुप्तपणे बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि अनेक व्हिडीओ हाती लागले.
तपासादरम्यान पोलिसांना एक पेन ड्राइव्ह सापडली असून त्यात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ आढळून आले आहेत. या व्हिडीओंमध्ये अनेक महिलांचे तसेच काही कथित प्रभावशाली व्यक्तींचे चेहरे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, खरात महिलांना प्रलोभन देऊन किंवा भीती दाखवून त्यांच्यावर अत्याचार करत असे आणि त्याचे चित्रीकरण गुप्तपणे करत असे. या प्रकरणाचा तपास नाशिक क्राइम ब्रांचकडून सखोलपणे सुरू आहे.
दरम्यान, आरोपीचे काही मोठ्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी संबंध असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील कारवाई सुरू आहे.















Discussion about this post