नाशिक । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे काही तास शिल्लक असून यामुळे नेते मंडळींच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. याच दरम्यान, नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभागृह नेते दिलीप दातीर यांनी ऐनवेळी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. हा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांना दिलीप दातीर यांनी पाठिंबा दिला आहे. दिलीप दातीर हे माजी नगरसेवक आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दिलीप दातीर निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते, परंतु मनसेकडून दिलीप दातीर यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज होते. प्रचाराला शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना दातीर यांच्या नाराजीचा फटका हा मनसेला बसल्याचं दिसून येत आहे. दिलीप दातीर यांनी भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भाजपची नाशिक पश्चमि विधानसभा मतदारसंघात ताकत वाढली आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी नाशिकचे माजी महापौर आणि मनसे नेते अशोक मुर्तडक यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अशोक मुर्तडक हे नाशिकचे माजी महापौर आहेत. मनसेची सत्ता असताना अडीच वर्ष ते नाशिकचे महापौर होते. अशोक मुर्तडक यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिक पूर्वमध्ये महाविकास आघाडीची ताकत वाढली आहे. एकीकडे अशोक मुर्तडक यांच्या पक्षप्रवेशामुळे मनसेला मोठा धक्का बसला होता. त्यातच आता दिलीप दातीर यांनी आपली भूमिका जाहीर करत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांत मनसेला दोन धक्के बसले आहेत.















Discussion about this post