नाशिक । गलेलठ्ठ वेतन असतानाही शासकिय अधिकार्यांना पैशांची हाव काही सुटत नाही. अशातच नाशिक सेंट्रल जीएसटी कार्यालयातील वरिष्ठ अधीक्षक हरिप्रकाश शर्मा याला पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात अटक केल्याने लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित वरिष्ठ अधीक्षकाला न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या कसबे वणी येथील उद्योजकावर जीएसटीसंदर्भात कोणतीही कारवाई न करण्यासाठी शर्माने ५० लाख रूपयांची मागणी केली. इतकी रक्कम देणे अशक्य असल्याचे संबंधित उद्योजकाने सांगितल्यानंतर २२ लाख रुपये देण्यावर तडजोड झाली. शर्मा २२ लाख रुपये मिळणार असल्याच्या आनंदात असताना संबंधित उद्योजकाने पुणे येथील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
दरम्यान, पाच लाख रुपये कोणत्या दिवशी द्यायचे आणि उर्वरित रक्कम किती दिवसांनी द्यावयाची, या संदर्भातील माहिती नाशिक सेंट्रल जीएसटी कार्यालयातील वरिष्ठ अधीक्षक हरिप्रकाश शर्माने संबंधित उद्योजकाला दिली. शहरातील सेंट्रल जीएसटी कार्यालयात लाच स्वरुपातील पहिला हप्ता म्हणजे पाच लाख रुपये उद्योजकाकडून स्वीकारताना शर्मा हा सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















Discussion about this post