नाशिक । शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू केलेल्या पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येत्या काही दिवसात वितरित केला जाणार आहे, परंतु या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या शिकार होत आहेत. सायबर ठगांनी पीएम किसान योजनेच्या फेक लिंक च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मोबाईल हॅक करुन लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.
सोशल मीडियावर पीएम किसान योजनेची बोगस लिंक किंवा एपीके फाईल पाठवून फसवणूक केली जात आहे. पीडीएफ फाईल ओपन करता क्षणी आपल्या खात्यातून पंधरा लाख रुपये गायब झाल्याची तक्रार एक बिल्डरने सायबर पोलिस ठाण्यात केली आहे. तर पीएम किसानची लिंक ओपन केल्याने अडीच लाख रुपये खात्यातून कट झाल्याची तक्रार एका शेतकऱ्याने केली आहे. नाशिकमध्ये असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांची अशाप्रकारे फसवणूक झाली आहे. यासंदर्भात सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.
या फेक लिंकच्या माध्यातून शेतकऱ्यांचे मोबाईल हॅक केले जात आहेत. बॅंक खात्याशी सलग्न मोबाईल फोन हॅंक करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी सायबर पोलिस ठाण्यात त्यासंदर्भात तक्रार दिली आहे. एपीके फाईलच्या माध्यमातून ही फसवणूक होत आहे. एपीके फाईल डाऊनलोड करताच विशिष्ट प्रोग्राम मोबाईलमध्ये अॅक्टिव होऊन टप्प्याटप्प्याने संपूर्ण बॅंक खातेच खाली झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही एपीके फाईल ओपन किंवा डाऊनलोड न करता ती थेट डिलीट करावी असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
प्रत्येकवेळी वेगवेगळे फंडे सायबर गुन्हेगार वापरत असतात. यापूर्वीही पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार राज्यभरात घडले आहेत. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्यातून वेळोवेळी यांसदर्भात सतर्क राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केलं जात आहे.
Discussion about this post