नंदुरबार : राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून एप्रिल महिन्यात ‘मे हिट’चा अनुभव जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई सारख्या समस्या उद्भवू लागल्या आहे. यातच नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीसंकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील निम्म्या लघु जिल्ह्यातील १३ पैकी सहा लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून केवळ २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेबरोबर धरणातील पाणी साठ्यातील बाष्पीभवनाच्या प्रमाणातही वाढ झाली असून ग्रामीण भागासाठी संजीवनी असलेल्या लघु प्रकल्पांच्या पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झालेली पाहण्यास मिळत आहे. मुळात नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईची समस्या मागील दीड महिन्यांपासून जाणविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे महिलांना दूरवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करत जावे लागत आहे. तर हे चित्र आणखी गडद होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान जिल्ह्यात तापमान ४३ ते ४४ अंशाच्या वर जात असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून त्यातून धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील १३ लघु प्रकल्पांपैकी सहा लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून लघु प्रकल्पांमध्ये २८.९८ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून येणाऱ्या काळात ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते.
तीन प्रकल्प कोरडे
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाला तीन प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. यात इच्छागव्हा, घोटणेको प.ब. आणि ढोंग या प्रकल्पत शून्य टक्के पाणी आहे. तर उर्वरित मेंदीपाडा २०.२५ टक्के, देवळीपाडा ३८.३०, रकानाला ३९.३६, अमरावतीनाला १३.०६, चौपाळे ५७.५४, सुरी ११.२०, नेसु ४८.२१, चिरडा ५३.०६, धनपूर ५६.५८, भरूवेल ४१.७१ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे; असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.















Discussion about this post