नंदुरबार । राज्यासह देशभरात लाचखोरीचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नंदुरबारमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) उपविभाग नंदुरबारचे उपअभियंताला 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. नितीन दत्तात्रेय इंगळे (वय- 53 वर्षे) असं लाचखोर उपअभियंताचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली
या प्रकरणातील तक्रारदार हे एक नोंदणीकृत शासकीय विद्युत कंत्राटदार आहेत. त्यांनी धडगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये सौर एलईडी पथदिवे (Solar Street Lights) बसवण्याचे काम पूर्ण केले होते. या कामाची एकूण किंमत सुमारे 2 कोटी 37 लाख रुपये इतकी होती. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आणि कंत्राटदाराला त्याचे पैसे मिळवून देण्यासाठी उपअभियंता नितीन इंगळे यांनी साडेआठ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या कामांपैकी मार्च 2025 मध्ये तक्रारदाराला 41 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते. मात्र या बिलाच्या मोबदल्यात उपअभियंता इंगळे याने तक्रारदाराकडून 80 हजार रुपये स्वीकारले असून उर्वरित 30 हजार रुपये पुढील बिलाच्या वेळी देण्यास सांगितले होते. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये उर्वरित कामाचे 2 कोटी 2 लाख 5 हजार 525 रुपये तक्रारदाराच्या फर्मच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.
अशी झाली कारवाई
लाचेची रक्कम जास्त वाटल्याने कंत्राटदाराने तडजोड केली, ज्यामध्ये 8 लाख रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, कंत्राटदाराने 27 जानेवारी रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, एसीबीने सापळा रचला. 9 फेब्रुवारी 2026 रोजी, ठरल्याप्रमाणे 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना इंगळे यांना पथकाने ताब्यात घेतले.















Discussion about this post