नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात काही दिवसांपूर्वी बालाजी मंगल कार्यालयात २२ नोव्हेंबरला विवाह समारंभ पार पडला. या विवाह समारंभातून सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरट्यानी गर्दीचा फायदा घेत लांबविली होती. चोरट्यांनी लांबविलेल्या या पर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम, मोबाईल असा ९ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. यामुळे विवाह सोहळ्यात प्रचंड गोंधळ उडाला होता. आता पोलिसांनी या चोरीचा तपास लावला असून मध्य प्रदेशातील टोळीतील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे.
दरम्यान याबाबत शहादा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी तपास करण्यासाठी एक पथक नेमले. यानंतर शहादा पोलिसांनी तपासाला सुरवात केली. या चोरीमध्ये मध्य प्रदेशातील गँगचा समावेश असल्याचे लक्षात आले.
यानंतर पोलिसांनी मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील सासी गँगचा शोध घेत जवळपास दहा दिवसांहून अधिक काळ वेषांतर करून मध्यप्रदेश मध्ये घालवले. दरम्यान लंपास करण्यात आलेल्या सोन्याचा छडा लावण्यात शहादा पोलीसांना यश आले आहे. या गुन्हा प्रकरणी मध्यप्रदेशमधील कुख्यात सासी गॅगच्या तीन सदस्यांचा शहादा पोलिसांनी मागोवा घेत होती.
मात्र हे तीन सदस्य पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरत होते. अखेर मध्य प्रदेशमध्ये सात दिवसाचा मुक्काम ठोकल्यानंतर सासी टोळीतील एका सदस्याच्या सावत्र आई ममताबाई पर्वत सिसोदिया (वय ५० वर्षे) हिच्या कडून ७ लाख २० हजार किंमतीचे १८ तोळे सोने हस्तगत करण्यात आला आहे. तर अन्य दोघांना देखील ताब्यात घेतले आहे.
Discussion about this post