नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील गडदाणी या गावात एका घरामध्ये देशी व विदेशी बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरु होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा टाकत कारवाई केली असून या ठिकाणाहून १० लाख ७९ हजार रुपये किंमतीची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.
नंदुरबारच्या विसरवाडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. दरम्यान १३ मे रोजी गुप्त बातमीदारामार्फत गडदाणी गावात अमृत पंतु गावीत याच्या घरामध्ये बनावट दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक साबळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करत सदर ठिकाणी छापा टाकला.
दरम्यान पोलीस पथकाने छापा टाकल्यानंतर अमृत गावीत यांच्या घरात तीन इसम बनावट दारु तयार करून प्लॅस्टीक टाकीतून बाटलीमध्ये भरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना बनावट दारु व दारु बनविण्याच्या साहित्यासह पकडले. यात पवन सिताराम शर्मा (वय ३३), हरिष राजेंद्र चौधरी (वय ३७) व अमृत पंतु गावीत (वय ३३) यांना ताब्यात घेतले आहे. तर कच्चा माल पुरविणारा हुसेनभाई धुळेवाला याचा देखील यात समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील १० लाख ७९ हजार ८८२ रुपये किंमतीची बनावट दारु तसेच दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य व वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर चोघांविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि नरेंद्र साबळे करीत आहेत.















Discussion about this post