जळगाव । लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असून अशात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार का? याची सध्या चर्चा होतेय. महाविकास आघाडीमध्ये जागांचं समसमान वाटप व्हावं. असा फार्म्युला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
जळगावमध्ये बोलताना नाना पटोले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांचं शरद पवार यांच्याशी बोलणं झालं आहे आमच्याशी आंबेडकरांचं अद्याप बोलणं झालेलं नाही. दिल्लीत बैठक घेण्याबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे या सर्व विषयावर चर्चा दिल्लीत केली जाईल असं पटोले म्हणाले.
दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या चर्चेवर केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस असतील हे सरळ सरळ खोटे बोलत आहेत. यांना राज्य बकाल करायचं, राज्याला उध्वस्त करायचं. हा फॉर्मुला आताच या सरकारचा दिसत आहे. महाराष्ट्राला बरबादीकडे घेऊन जाण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, हे यावरून स्पष्ट झालं आहे. प्रकल्प बाबत अजित पवार यांच्या हातात काय आहे? मात्र बोलावं लागतं म्हणून ते बोलतात, असं नाना पटोले म्हणाले.
Discussion about this post