नागपूर : देशासह महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण दिवासेंदिवस वाढत चालले असून अशातच आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या घटनेत कारमधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा अपघात नागपूर जिल्ह्यामधील काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरात रात्रीच्या सुमारास घडली.
अपघाताची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही.
प्राथामिक माहितीनुसार, मृत व्यक्ती हे काटोल तालुक्यातील रहिवासी होते. शुक्रवारी ते नागपूरमध्ये एका लग्नसमारंभासाठी आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण कारमधून काटोलच्या दिशेने परतत होते.
मध्यरात्री कार सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान आली असता, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कारमधील ६ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला.
Discussion about this post